बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन
स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन
पारनेर : २४ फेब्रुवारी
पारनेर तालुका हा ग्रामीण भाग आहे, तालुक्यातील अनेक नागरीक अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी अडचण येत असते, स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशिक्षित नागरिकांना मदत न करता नाहक त्रासदायक वागणूक दिली जाते. यासाठी स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास पारनेर मनसेच्या वतीने १ मार्च रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी स्टेट बँक पारनेर शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला. यासंदर्भात शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निखील बोरकर,अक्षय सूर्यवंशी, अविनाश औटी, संतोष सोबले, गोकूळ थोरात, रियाज राजे आदी उपस्थित होते.
स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून, रोखापालांकडून अल्पशिक्षित, वृध्द, निवृत्ती वेतन धारकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, काम टाळण्यासाठी बँके ऐवजी ग्राहक सेवा केंद्रात व्यवहार करण्याची सक्ती करण्यात येते. बँकेत खाते उघडणे निःशुल्क असताना देखील ग्राहक सेवा केंद्रात खाते उडण्याची सक्ती केली जाते व त्यासाठी १०० रुपये आकारण्यात येतात. कर्मचाऱ्यांचे काम टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा बँकेच्या एटीएम मध्ये अनेक वेळा रक्कम शिल्लक नसते. एटीएम सह कॅश डिपॉझीट मशिन वारंवार बंद पडते. बँक कामकाजाची ( व्यवहाराची ) वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अशी सलग असताना देखील दुपारी एक तास व्यवहार बंद ठेवण्यात येतात. तशी सूचना बँकेच्या आवारात लावलेली नसल्याने ग्राहकांना ताटकळत बसावे लागते. कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. बँक कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, अश्या विविध तक्रारी वसिम राजे यांच्याकडे आल्याने शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांना निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत.
येत्या आठ दिवसांत कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत व बॅंकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष वसिम राजे यांनी शाखा व्यवस्थापक यांना दिला आहे.
ग्राहकसेवा केंद्रात व्यवहार करण्याची अथवा खाते सुरू करण्याची सक्ती करण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी व्यवहार बंद राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. संपूर्ण तालुक्यात स्टेट बँकेच्या पारनेर शाखेच्या एटीएमचा सर्वात जास्त वापर होतो. तांत्रिक बिघाडामुळे अपवादात्मक परिस्थितीत एटीएम बंद पडू शकते. एटीएम व कॅश डिपॉझीट मशीनचा ग्राहकांनी योग्य रितीने वापर केला तर बिघाडाचे प्रमाण आणखी कमी होईल. सलग सुट्या असल्यावर एटीएममध्ये रक्कम शिल्लक रहात नाही. ग्राहकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. - श्रीराज शेवाळे, शाखा व्यवस्थापक] यांनी म्हटले
Comments
Post a Comment