छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला
छत्रपती श्री. उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’ वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला
मराठा आरक्षणावर चर्चा ?
[ 'कृष्णकुंज'वर उदयनराजेेेेेेेे भोसले यांचे स्वागत करताना मा. राजसाहेब ठाकरे ]मुंबई :
भाजपचे खासदार छत्रपती श्री. उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, मराठा आरक्षणा संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
छत्रपती श्री. उदयनराजे भोसले हे आज संध्याकाळी ५ वाजता कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच छ. उदयनराजे भोसले हे मा.राजसाहेब ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
छत्रपती श्री. उदयनराजेंच्या भेटीगाठी
मराठा आरक्षणावर तोडगा निघावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या पूर्वी त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली होती. छ.उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावरही आले होते.
मुख्यमंत्र्यांशीही खलबतं
तत्पूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले होते.
छत्रपती श्री. उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पाच प्रश्न
>> जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का?
>> जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ?
>> ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ?
>> महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.
>> MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?
छत्रपती श्री.उदयनराजे भोसले व मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीचे कारण
छत्रपती श्री. उदयनराजे भोसले ह्यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना राजमुद्रा भेट दिली.
Comments
Post a Comment