मनसे करणार गावोगाव लाडू वाटप; कारण ऐकून थक्क व्हाल!
मनसे करणार गावोगाव लाडू वाटप; कारण ऐकून थक्क व्हाल!
पेट्रोलचे दर शंभरीपार गेल्याचा निषेध म्हणून मनसे पारनेर तालुक्या वतीने लाडू वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. लाडू वाटून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला जाणार आहे.
पेट्रोलचे दर १०० च्या पार; विरोधक आक्रमक
गावोगाव लाडू वाटून मनसे करणार सरकारचा निषेध
मनसे पारनेर तालुक्याच्या वतीने करणार आगळंवेगळं आंदोलन
पारनेर: इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांकडून आणि नागरिकांकडूनही विविध प्रकारची आंदोलने केली जातात. निषेध, निदर्शने, मोर्चा, बैलगाडी मोर्चा वगैरे आंदोलने नेहमीच पहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुक्याच्या वतीने मात्र वेगळेच आंदोलन पुकारले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्याच्या निषेधार्थ गावा-गावात लाडू वाटप करून दरवाढ आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असते. वाढीव वीज बिलाच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जामंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी तहसील आणि पोलीस खात्याला पत्र दिले होते.
भाजप सरकार विरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रोजी भाळवणी येथे नागेश्वर मंदिर देवस्थान ते भाळवणी बस स्टॉप तसेच बाजार परिसरात लाडू वाटप करण्यात येणार आहे. फटाके वाजवून पेट्रोलच्या दराने शंभरी पूर्ण केल्यामुळे उपरोधिकपणे शतकपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
याबद्दल रोहोकले यांनी सांगितले की, ‘सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. या दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात अनेक आंदोलने सुरू आहेत. आम्ही याचा वेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहोत. गुरुवारी सकाळी भाळवणी येथे नागेश्वर मंदिरापासून लाडू वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठेवण्यात आला आहे. लोकांना दरवाढीची जाणीव करून देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. मनसेतर्फे आम्ही तालुक्यात नेहमी वेगळ्या प्रकारची आंदोलने करतो. त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे लाडू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.’
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पुशेठ लामखडे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष आशपाक हवलदार,तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, सतीश म्हस्के, महेंद्र गाडगे विद्यार्थी सेनेचे तालुका सचिव जालिंदर बांडे, उपाध्यक्ष अजय दावभट, शुभम आहेर, अक्षय सुर्यवंशी ,बाळासाहेब माने, यांच्यासह पदाधिकारी मनसे अंगीकृत संघटना, सोशल मीडिया टिम,महाराष्ट्र सैनिक, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
Comments
Post a Comment