कोणाचंही प्यादं बनून राहू नका, निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हा, बदल घडवा: राज ठाकरे
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिला भगिनींना मा.राजसाहेब ठाकरेंच खास पत्र
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने मनसेप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई: जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने मनसेप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतानाच या पोस्टमध्ये मा.राजसाहेब ठाकरे यांनी महिलांसाठी खास संदेश लिहला आहे. राजकारणात आणि समाजकारणात असणाऱ्या महिलांनी कोणाचंही प्यादं बनून राहायची गरज नाही. तुम्ही निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन बदल घडवला पाहिजे, असे आवाहन मा.राजसाहेब ठाकरे यांनी केले आहे.
मा.राजसाहेब ठाकरे यांच्या पत्रातून
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.
आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.
बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
मा.राजसाहेब ठाकरे
#महिलादिन #जागतिक_महिला_दिन
Comments
Post a Comment