आमची लोकं मरायला लागलीत, तुम्ही जीआर काय दाखवताय ?
अरे आमची लोकं मरायला लागलीत, तुम्ही जीआर काय दाखवताय ? मा.वसंत मोरेंचा रौद्रावतार
"छोट्या-छोट्या कोव्हिड सेंटरलाही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालीच पाहिजेत, अशी मागणी वसंत मोरेंनी केली.
पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
पुण्यात आरोग्य सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून रुग्णांसाठी बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अत्यावस्थ रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड यासोबतच रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक हतबलता व्यक्त करत असून सोशल मीडियाद्वारे तरुण पिढी पडतीसाठी पुढाकार घेत आहे. मात्र, यामध्ये देखील काही मर्यादा येत असल्याने रुग्णांचे प्राण जात आहेत.
दरम्यान, पुण्यातील मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा रौद्रावतार धारण करत रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून महापालिका अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. छोट्या-छोट्या कोव्हिड सेंटरलाही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालीच पाहिजेत, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वसंत मोरेंनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून लाईव्ह सुरु चित्रीकरण सुरु केलं असता ‘परवानगीविना फोटो कसे घेता?’ असं विचारणाऱ्या महिला अधिकाऱ्यालाच झापलं आहे.
https://twitter.com/TV9Marathi/status/1386984611025063940?s=19
‘हे लोकं चुका करणार… आज या डॉक्टरांकडची परिस्थिती ऐका… रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही म्हणून रोज आठ ते दहा पेशंट शिफ्ट करावे लागत आहेत. बाहेरच्यांना बेड मिळत नाहीत. आम्ही बोलायला गेलो की अधिकारी टेबलवरुन उठून जातात. आम्ही आमच्या घरच्यांसाठी मागतोय काय? आमची लोकं मरायला लागलीत तरी? कुठवर तुम्ही जीआर दाखवणार? एक नगरसेवक काम करतोय, तर त्याला सपोर्ट करायचा सोडून तुम्ही त्याला बाहेर खेचता,’ असं म्हणत मोरेंनी संताप व्यक्त केलाय.
यावेळी महिला अधिकाऱ्याने मोबाईलकडे बोट करून कॅमेरा बंद करण्यास सांगितले. यावर मोरे अधिकच संतापले. ‘नाही बंद करणार, माझा हक्क आहे तो.’ यावर, ‘एका स्त्रीचे फोटो घेण्याआधी तुम्ही परवानगी घेतलीत का?’ असा प्रतिप्रश्न महिला अधिकाऱ्याने केला असता आपण फेसबुक लाईव्ह करत असल्याचं मोरेंनी सांगितलं.
१६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड जरी केले असते तर आज…
‘पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असते. आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो. अजूनही वेळ गेलेली नाही.’ असं आवाहन देखील वसंत मोरे यांनी केलं आहे.
Comments
Post a Comment