‘कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शाळेची फी, बस फी सर्वच शाळांनी माफ करावी;
‘कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शाळेची फी, बस फी सर्वच शाळांनी माफ करावी; किंबहुना…’
मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. अशातच, कडक निर्बंध, टाळेबंदी, व्यवसायांमधील मंदी यामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि अशातच पाल्यांच्या शाळांकडून फी ची मागणी याने आर्थिक विवंचनेत भर पडली आहे.
शाळांनी कोरोना काळातील वाढीव फी माफ करावी. तसेच, प्रत्यक्षात शाळा सुरु नसल्याने फी कमी करावी अथवा ती आकारण्यात येऊ नये अशी मागणी गेल्या वर्षभरात केली जात आहे. हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. तर, कोरोनाने पालकच गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे.
अशातच छत्तीसगडमधील खासगी शाळांनी स्तुत्य निर्णय घेतला आहे. छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटने ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोनामुळे निधन झालं आहे अशा विद्यार्थ्यांची फी न घेण्याच निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्कूल बस, गणवेशाची फी याचा देखील समावेश असेल. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. हे लक्षात ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील असा निर्णय घ्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. मनसे नेते मा. बाळा नांदगावकर साहेब यांनी, ‘कोरोना ने पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी,बस फी यावर्षी सर्वच शाळांनी माफ करावी. किंबहुना शिक्षण मंत्र्यानी सरसकट तसे आदेशच दयावेत. छत्तीसगड येथील खाजगी शाळांनी मनाचा मोठेपणा दाखवत तसा निर्णय घेतला आहे,’ असं म्हणत ही मागणी ट्विटद्वारे केली आहे
Comments
Post a Comment