मनोरंजन क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत मा.राजसाहेबांनी झूम बैठकीद्वारे साधला संवाद

राज्यात चित्रिकरण सुरु व्हायला हवं, याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : राज ठाकरे 
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टाळेबंदी लागली आणि चित्रिकरण थांबलं. पहिल्या टाळेबंदीत पडला तसा खंड पडू नये म्हणून अनेक निर्मात्यांनी परराज्यात आसरा घेतला. आता जवळपास महिन्याभरापासून तिकडे त्यांचं चित्रिकरण सुरू आहे. 
 परराज्यापेक्षा महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सुविधा अधिक आहेत. हे लक्षात घेता, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलं. मनसे चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या झूम बैठकीत मा.राजसाहेब यांनी उपस्थितांचे सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि ही बैठकीच्या शेवटी आपलं हे मत मांडलं. 
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष मा.अमेय खोपकर साहेब यांच्या पुढाकाराने मनोरंजन क्षेत्रातल्या मान्यवरांची झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मा.राजसाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मराठी चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या 50 पेक्षा जास्त मान्यवरांनी या बैठकीत सहभाग घेतला. बैठक जवळपास दीड तास चालली. या बैठकीत अनेक मुद्दे मांडले गेले. यात प्रामुख्याने आले ते चित्रिकरण सुरू करण्याचा मुद्दा. बायोबबल प्रणालीनुसार परराज्यात जर काम होतं तर महाराष्ट्रातही होऊ शकेल असं मत यावेळी मांडण्यात आलं. शिवाय, लोक कलावंतांंना आर्थिक पॅकेज मिळावं, थिएटर्स मालकांची झालेली अवस्था, वाद्यवृंदाचे कलाकार, रंगमंच कामगार यांना अनुदान मिळावं, सध्या तयार असलेल्या चित्रपटांबद्दल काय करता येईल असे अनेक मुद्दे यावेळी मांडले गेले. 
मा.राजसाहेब ठाकरे यांनी शांतपणे सगळ्यांचे मुद्दे ऐकले आणि ते टिपूनही घेतले. यातल्या अनेक मुद्द्यांवर मा.राजसाहेब  बोलले. काही मुद्दे आपण स्वत: मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी दिलंच, शिवाय पुढच्या दोन दिवसांत यावर कार्यवाही होईल असा विश्वासही दर्शवला. गरज पडली, तर आपण मुख्यमंत्र्यांसोबतही झूम बैठक करू असं यावेळी त्यांनी सांगितलं. या बैठकीला महेश मांजरेकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, सतीश राजवाडे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, कौशल इनामदार, समित कक्कड, आदित्य सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे