निलेश लंकेची ‘ती’ अब्रुनुकसानीची नोटीस की खंडणी पत्र? मनसे आक्रमक
निलेश लंकेची ‘ती’ अब्रुनुकसानीची नोटीस की खंडणी पत्र? मनसे आक्रमक
मुंबई :
कोविड केअर सेंटरमध्ये आगळेवेगळे उपक्रम राबवून स्वत:ला रुग्णसेवेत गुंतवून घेतलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करून लंके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याला एक कोटी पाच हजार रूपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे.
अविनाश पवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे, ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार बदनामी पोटी 1 कोटी रुपये आणि नोटीस खर्च 5 हजार असे एकूण 1 कोटी 5 हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी या नोटीशीवर आक्षेप घेतला आहे. ‘ही अब्रुनुकसानीची नोटीस की खंडणीसाठीचं पत्र?’ असा सवाल देखील चित्रे यांनी उपस्थित केला आहे. ‘अब्रुनुकसानीची नोटीस आहे,कि खंडणीसाठीचं पत्र? आपल्या ह्या बेकायदेशीर नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊच. निलेश लंके ही लढाई आपण सुरू केली पण ही लढाई संपवणार आम्हीच हे निश्चित…’ असा निर्वाणीचा इशारा देखील मनसे तर्फे निलेश लंके यांना देण्यात आला आहे.
लंकेच्या वकिलाचं म्हणणं काय ?
निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, ‘पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.’
दरम्यान, दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला आहे.

Comments
Post a Comment