मनसे आक्रमक; अहमदनगरचे नाव अंबिकानगर? शहरात पोस्टर झळकवले.

मनसे आक्रमक; अहमदनगरचे नाव अंबिकानगर? शहरात पोस्टर झळकवले.

अहमदनगर : औरंगाबादचं संभाजीनगर. अहमदनगरचं अंबिकानगर. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ही नावं दिली होती. पुढे शिवसेनेने हीच भूमिका अनेक वर्षे लावून धरली. गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा मागे पडला आहे. तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरला आहे. नगर शहराच्या स्थापना दिनी त्यांनी अंबिकानगर असं नामकरण करून बारसं घातलं. केडगावच्या वेशीपासून ते थेट माळीवाडा वेशीपर्यंतचे चौक, खांबांवर नामकरणाचे फलक डकवले आहेत. सोशल मीडियावर या नामकरण सोहळ्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केलाय. त्यामुळे नव्याने चर्चा सुरू झालीय.
शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कायनेटिक चौक येथील सर्कलला नामांतराचे फलक लावून आंदोलन करण्यात आले होते. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी शहरातील मुख्य ठिकाणी अंबिकानगरचे पोस्टर लावण्यात आले. मा.राजसाहेब ठाकरे छायाचित्रासह अंबिकानगर शहरात आपले स्वागत आहे, अश्या आशयाचे पोस्टर ठिकठिकाणी दिसून आले.

औरंगाबादच्या पाठोपाठ अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतराच्या मुद्द्यावरून अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु शुक्रवारी अहमदनगर शहराच्या स्थापना दिवशी केलेल्या आंदोलनामुळे नामांतराच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनविसेच्या या आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गायकवाड, स्वप्निल वाघ, प्रमोद ठाकूर, ओमकार काळे, योगेश गुंड, पांडुरंग काळे, बंटी जगदाळे, महादेव दहिफळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या नामकरणाबाबत लवकरच कोर्टात धाव घेणार असल्याचेही मनसेने जाहीर करून टाकलंय. लॉकडाउननंतर पक्षाचे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे यांना भेटून ही चळवळ व्यापक करणार असल्याचे मनसेचे सुमित वर्मा यांनी बोलताना सांगितले.

नामांतराची मागणी करताना मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अहमदनगर शहराचे नाव पूर्वी अंबिकानगर असे होते. त्याचे दाखले शिव स्वराज्यात देखील मिळतात. त्यामुळे अहमदनगरचे नाव हे अंबिकानगर व्हायलाच हवे. शहर स्थापना दिनी अंबिकानगर नामकरणाचे फलक लावून आम्ही प्रशासन, राज्य सरकार यांच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंबिकानगर असं नामकरण होण्यासाठी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जनआंदोलन उभारू, असा इशारा मनसेच्या सुमित वर्मा यांनी दिला आहे.

अहमदनगरच्या नामकरणास बहुतांशी लोकांचा विरोध आहे. तर काही समाज संघटनांनी अंबिकानगर नावाला वेगवेगळे पर्याय दिलेत. गेल्या काही वर्षांपासून हा वाद अधूनमधून उदभवत असतो. परंतु आता मनसेने केलेल्या नामकरणामुळे तो पुन्हा चेतण्याची शक्यता आहे. मधल्या काळात भाजपनेही नामकरणाबाबत उचल खाल्ली होती. त्यांनाही अहमदनगर हे नाव नको आहे.

योगी सरकारची मनसेला मदत

योगी सरकारने उत्तर प्रदेशात बहुतांशी शहरांचे नामकरण केले आहे. नामकरणास कायदेशीर अधिष्ठान मिळावे यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. नगर शहराचे नाव अंबिकानगर असल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. त्याच आधारे आम्ही ही मागणी लावून धरली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान ही संघटनाही नामकरणासाठी अनुकूल आहे. भिडे गुरूजी यांनीही नगरच्या सभेत अंबिकानगर अशी घोषणा केली होती. या चळवळीशी अनेकांची पूरक भूमिका आहे. समविचारी संघटनांसोबत संयुक्तरित्या बैठक घेऊन ती पुढे नेली जाणार आहे. लवकरच याबाबत कोर्टात याचिका दाखल केली जाईल, असेही मनसेचे वर्मा यांनी सांगितलं.

इतिहास काय सांगतो

२८ मे हा नगर शहराचा स्थापना दिन असतो. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमही होतात. देशात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच शहरांना जन्मदिवस माहिती आहे. त्यात नगरचा समावेश आहे. अहमद निजामशहाने सन २८ मे १४९४ रोजी हे शहर वसविल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. निजाम दरबारातील इतिहास लेखक फरिस्ता याच्या गुलशन ए इब्राहिमी या ग्रंथातही हा उल्लेख आहे. हीच नगरी त्याची पुढे राजधानी बनली. मलिक अहमद दौलताबादची मोहीम आटोपून राजधानी जुन्ररकडे परतत होता. तो बाग इ निजाम येथे थांबला. त्याच्या सैन्याची येथे छावणी होती. सीना नदीच्या काठावर असलेल्या या छावणीचे शहर बनले. परिसरातील कारागीर, शिल्पकार, गवंडी बोलावून घेत सतत दोन वर्षे ते काम करीत राहिले. शहराच्या कडेने वेशी उभारल्या गेल्या. दिल्ली दरवाजा, माळीवाडा वेस अजूनही त्याची साक्ष देतात. इस. १४९६ रोजी (हिजरी ९०२) शहर पूर्ण झाले. त्यानंतर अहमदशहाने जुन्नरची राजधानी नगरला हलवली. आणि नगरला सौंदर्य लाभले. या सौंदर्याची तुलना कैरो, बगदादसोबत केली जात.

स्थापना आणला कुठून...

आमच्याकडे धार्मिक आणि ऐतिहासिक पुरावे आहेत. ते पुरावे आम्ही कोर्टात सादर करू. सरकारलाही नामकरण करण्यास भाग पाडू. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९९५मध्ये नगरमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करून टाकले होते. केडगाव उपनगरात अंबिका देवी आहे. तिचेही पौराणिक महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही देवीच्या नावावरून ही मागणी लावून धरली आहे. शहराचा स्थापना दिन मानत नाहीत.

-सुमित वर्मा , जिल्हाध्यक्ष.महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments

Popular posts from this blog

छत्रपती श्री.उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला

बँकेच्या कामकाजात सुधारणा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे