…तर ‘त्या’ हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा, अमेय खोपकरांचं सरकारला चॅलेंज
…तर ‘त्या’ हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा, अमेय खोपकरांचं सरकारला चॅलेंज
मराठी निर्मात्यांकडून कोव्हिडसंबंधी नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे." असा दावा मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन केला आहे.
काय म्हणाले अमेय खोपकर?
राज्य सरकारने मुंबईत मालिका, चित्रपटांना शूटिंगची परवानगी दिली आहे. मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बायोबबलमध्ये काटेकोर नियमांचं पालन करत हे शूटिंग करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अशा परिस्थितीत काही हिंदी निर्मात्यांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे. त्याचसोबत शूटिंगसाठीच्या नव्या नियमांचा पूनर्विचार करावा, असंही त्यांनी सुचवलं आहे. 'राज्य सरकारने मुंबईत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच शूटिंगची परवानगी दिलेली आहे आणि तेही बायो-बबलमध्ये. मराठी निर्मात्यांकडून हे नियम काटेकोरपणे पाळले जातायत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे', असं ट्विट खोपकरांनी केलं आहे.
“तरच इंडस्ट्रीत सगळं सुरळीत होईल”
'कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नाही, असं खरंच यंत्रणांना वाटत असेल तर मग जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवावी,' असं खुलं आव्हानंही त्यांनी सरकारला दिलं आहे. राज्यातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चित्रपट आणि मालिका निर्मात्यांशी संवाद साधला होता. शासन घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं. त्यानुसार अटी-शर्तींवर मुंबईत पुन्हा शूटिंग सुरू करण्यात आलं. मात्र काही निर्मात्यांकडून नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नसल्याचं अमेय खोपकर यांनी लक्षात आणून दिलं.
राज्यात चित्रीकरणासाठी एसओपी
कोरोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने सर्व प्रकारच्या चित्रीकरणावर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली होती. मात्र आता संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment