नवीमुंबई विमानतळाला शिवरायांचंच नाव असेल : मा. राजसाहेब ठाकरे
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव : मा राजसाहेब ठाकरे
मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे," असं राजसाहेब म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनीही शिवरायाचंच नाव सूचवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राजसाहेब ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
राजसाहेब ठाकरे म्हणाले की, "आमदार ठाकूर यांनी माझी भेट घेतली. नवी मुंबई होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावी अशी मागणी त्यांची मागणी आहे. तर सरकारकडून या विमातळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्याव, अशी भूमिका समोर येत आहे. त्यामधून वाद, मोर्चे, आंदोलन होत आहे. याबाबत पाठिंबा द्यावा यासाठी ते मला भेटायला आले होते. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आताचं विमानतळ हे डोमेस्टिक राहणार आणि नवी मुंबईत होणारं विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार. ते जरी नवी मुंबई किंवा पनवेल या भागात होणार असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. तिथून टेकऑफ आणि लॅण्डिंग होणारं विमान हे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच होणार आहे. त्याची जागा फक्त तिथे गेली आहे. शिवडी-न्हावा शेवा मार्ग त्यासाठी केला जात आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव राहणार. डोमेस्टिक विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे. हा महाराष्ट्र आहे, मुंबई राजधानी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायचंच नाव असेल."
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आदरणीय आहे. दि बा पाटील हे देखील लोकनेते होते, त्याबाबतही दुमत नाही. परंतु हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणंच उचित आहे. शहराच्या बाहेर असलं तरी ते मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की शिवरायचं नाव दिलं पाहिजे. त्यामुळे महाराजांच्या नावावर चर्चा होऊ शकत नाही. शिवाजी महाराजाचं नाव आलं तर संघर्षाचा विषय येईल असं मला वाटत नाही. माझ्या बोलण्यानंतर कोण कोण रस्त्यावर उतरतो ते बघू. वेळ आली तर या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन." असं राजसाहेब ठाकरे पुढे म्हणाले.
नामकरणाचा वाद सुरु असताना मनसेच्या आमदारांनी देखील पाठिंबा दिला होता, याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "राजू पाटील मला भेटून गेले. त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितलं तेव्हा हा विषयच संपला अशी त्यांची प्रतिक्रिया होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे कोणाचंही येऊ शकत नाही."
Comments
Post a Comment